65 वर्षीय शेतकऱ्याचा विद्युत तारेचा शॉक बसल्याने मृत्यू शेजारच्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल..


65 वर्षीय शेतकऱ्याचा विद्युत तारेचा शॉक बसल्याने मृत्यू शेजारच्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल..
महाशाही न्यूज मराठी बार्शी 
बार्शी तालुक्यातील धामनगाव (आ) येथे शेतातील कुंपणाला अनधिकृतपणे विद्युत प्रवाह सोडल्यामुळे शेतकरी रघुनाथ निवृत्ती ढोणे वय 65 वर्षीय यांचा  शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धामनगाव (आ) येथे घडली आहे. सदर प्रकरणी मृत रघुनाथ ढोणे यांच्या पत्नी शोभा रघुनाथ ढोणे यांनी शेजारील शेतकरी बाबाराव निवृत्ती ढोणे यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.म. नंबर 18/2025 ) केली आहे.


या बाबतची सविस्तर माहिती अशी की शोभा रघुनाथ ढोणे वय 59, रहाणार. आगळगाव रोड, बार्शी, मूळ रहाणार  धामनगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपले पती रघुनाथ ढोणे यांच्यासह बार्शी येथे राहत होत्या. त्यांच्या दोन मुली, रजनी आणि रोशनी, या त्यांच्या कुटुंबासह पुणे येथे वास्तव्यास आहेत. शोभा आणि रघुनाथ अधूनमधून आपल्या मुलींकडे पुणे येथे जात असत. धामनगाव (आ) येथे त्यांची गट नंबर 45 मधील शेती असून, ती शेती महारुद्र उर्फ मिठू सुदाम धुमाळ हे बटाईने कसतात.

6 मार्च 2025 रोजी शोभा आणि रघुनाथ हे पुणे येथून धामनगाव (आ) येथे गावच्या यात्रेनिमित्त आले होते. शेतातील ज्वारीचे पीक काढण्यासाठी रघुनाथ गावीच थांबले, तर शोभा 16 मार्च 2025 रोजी पुण्याला मुलीकडे परतल्या. दिनांक . 19 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संगिता रमेश अवधूत (रा. धामनगाव) यांनी शोभाला फोन करून रघुनाथ आजारी असल्याचे सांगितले आणि त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. त्यानुसार शोभा, त्यांच्या मुली आणि इतर नातेवाईक पुण्याहून बार्शीकडे येत असताना  टेंभुर्णी येथे पोहोचल्यानंतर दुपारी 2:15 वाजता धामनगावचे पोलीस पाटील हरी कुंभार यांनी शोभाला फोनवर कळवले की, रघुनाथ यांचा बाबाराव निवृत्ती ढोणे यांच्या शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव बार्शीला आणले असल्याचे सांगितले. शोभा आणि नातेवाईक हे सर्वजण बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले , जिथे रघुनाथ यांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले . त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार बार्शी येथे रघुनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदर घडलेल्या प्रकाराची  माहिती घेण्यासाठी शोभा ह्या  धामनगाव येथे गेल्या असता, गावकऱ्यांनी त्यांना  सांगितले की, बाबाराव निवृत्ती ढोणे यांनी त्यांच्या शेतात रानटी डुकरांचा उपद्रव टाळण्यासाठी शेताच्या कुंपणाला लाकडी खांबांना लोखंडी तार बांधून त्यात अनधिकृतपणे विद्युत प्रवाह सोडला होता. या तारेचा शॉक रघुनाथ यांना लागला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 19 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी घडली असल्याचे सांगितले.

सदर घटनेची पूर्ण खात्री झाल्यानंतर शोभा यांनी 23 एप्रिल 2025 रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बाबाराव निवृत्ती ढोणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. फिर्यादीत त्यांनी नमूद केले की, बाबाराव यांनी तारेला विद्युत प्रवाह सोडल्याने मनुष्यहानी होऊ शकते याची पूर्ण जाणीव होती, तरीही त्यांनी हा धोका पत्करला. यामुळे रघुनाथ यांचा मृत्यू झाला असून, त्यासाठी बाबाराव जबाबदार असल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.म. नंबर 18/2025) करण्यात आली आहे. शोभा यांच्या तक्रारीनंतर बार्शी पोलीसांनी बाबाराव निवृत्ती ढोणे यांच्याविरुद्ध संबंधित प्रकरणी   योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...