प्रकाश सापळे वापरुया आणि हुमणीचा नायनाट करूया...
[ महाशाही न्यूज मराठी :- रणवरे संभाजी ]
तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी, हुमणी सापळा प्रात्यक्षिक, बिजप्रक्रिया, बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावात तालुका कृषि अधिकारी, इंदापूर, श्री.भाऊ साहेब रुपनवर, यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कृषि पर्यवेक्षक सचिन चितारे व कृषि सहाय्यक श्रद्धा घोडके यांनी बीजप्रक्रिया व बियाणे उगवणक्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच आर. एस.घुले प्रभारी मं.कृ.अ. सणसर यांनी बी. बी एफ द्वारे पेरणीचे महत्त्व समजावून सांगितले.
तसेच हुमनी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करताना कृषि अधिकाऱ्यांनी सांगितले की, वळीवाचा पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीत सुप्त अवस्थेत असणारे भुंगेरे प्रजननाकरिता कडुलिंब, बाभूळ , बोर या झाडांवर मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाभूळ, कडुलिंब या झाडांखाली प्रकाश सापळा लावावा.
एका प्रकाश सापळ्यात किमान शंभर भुंगेरे अडकतात व मरून जातात. एक मादी भुंगेरा ६० ते ७० अंडी घालून त्यातून किमान ५० हुमनीच्या अळी तयार होतात.असे १०० मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास ५००० हुमणी अळी कमी खर्चात नियंत्रित करता येते. हे भुंगेरे २० ते २५ जूनपर्यंत आढळून येतात. त्यानंतर त्यांची अंडी व अळी अवस्था सुरु होते, अळी अवस्थेचे नियंत्रण करणे अतिशय अवघड आणि खर्चिक आहे. त्यामुळे भुंगरे अवस्थेतच भुंगेरे नष्ट केले तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होत नाही.
त्यामुळे इंदापूर कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे.


