17 लाख हिंदू कुटुंबांनी मोदींच्या काळात भारताचं नागरिकत्व सोडलं..अॅड प्रकाश आंबेडकरांचा आरोप..
[Dharashiv Lok Sabha 2024 ] धाराशिव लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर (Modi Government) गंभीर आरोप केला. ते म्हणाले, एक अत्यंत महत्वाची माहिती केंद्र सरकारने दडवली आहे आणि काँग्रेसवाले त्यावर बोलायला तयार नाहीत. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर दिलं आहे. एकंदरित 17 लाख कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन स्थायिक झाले आहेत.
त्यांच्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना धमकावलं जातं होतं, त्यातूनच त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
ही जी 17 लाख कुटुंबं होती, त्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटींची होती. हे आकडे माझे नाहीत. राज्यसभेच्या वेबसाईटवर तुम्हाला हे आकडे मिळतील. त्यांच्यापैकी काहींना विचारलं , तुम्ही देश सोडून बाहेर का जात आहात. तेव्हा ते म्हणत होते की, आम्ही ही जी पन्नास कोटींची मालमत्ता कमावली आहे, ती आमच्या बापदादांनी घाम गाळून, मेहनत करून मिळविलेली आहे, असा दावा ही आंबेडकर यांनी या प्रसंगी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडे मागण्या केल्या जातात. त्या मागण्या आम्हाला पूर्ण करता येत नाहीत; म्हणून आम्हाला धमकावलं जातंय. आम्ही असं ठरवलंय की आपल्या बापदादांनी कमावलेली इज्जत मातीत मिळविण्यापेक्षा आम्ही भारत सोडून परदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे .
यासाठी तुम्ही नरेंद्र मोदी [ भारतीय जनता पक्षाला ] सत्तेमध्ये बसवलं होतं का ? की 17 लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडून जाव म्हणून ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक कोणत्या तोंडाने आता मोदींसाठी मतदान मागणार आहात. हे वसुलीचे राज्य आहे. तेव्हा मी बार्शीतील व्यापाऱ्यांना सांगतो की राजकारणी, कारखानदार यांच्यावर आतापर्यंत छापे टाकून झालेले आहेत. आता नंबर तुमचा आहे. तुम्ही भाजपला भले डोनेशन द्या पण मत देऊ नका. जर तुम्ही भाजपला मत दिलं की तुमचा नंबर लागणार आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही बार्शीच्या व्यापाऱ्यांना त्यांनी दिला.
त्यानंतर पुढे म्हणाले की, मोदींना फक्त जुलमेबाजी करायची आहे आणि लोकांना फसवायचं आहे.
मोदी सरकारच्या काळात कर्जाचे प्रमाण वाढत चाललं आहे. पुढची पाच वर्षे तुम्ही मोदींना दिली, तर ते देशाला कंगाल करतील, असा आरोप ही केला.




